कुंभार्ली घाटातली वाघबारस
वाघबारसविषयी मी ऐकून होतो. तलासरी भागात असल्यामुळे इथल्या वाघबारसची कल्पना आहे परंतु कुंभार्ली घाटात होणारी वाघबारस पाहायची उत्सुकता लागली ती सदफची पोस्ट पाहिल्यावर. खरं तर हा मागच्या वर्षीचा(२०२३) अनुभव आहे. चिपळूण येथे राणी आणि सदफ यांच्या सह्याद्री संवर्धन व संशोधन संस्थेत(SCRO) पोचलो. तिथून आम्ही कुंभार्ली घाटच्या दिशेला निघालो. घाटमाथ्यावर किसरुळे, भाटी, केमसी आणि कासारखडकपाडा असे चार धनगर समाजाचे पाडे. त्यातील कासारखडकपाडा येथे वाघबारस साजरी करण्याकरिता तिकडे गेलो. कासारखडक पाड्यात एकूण पाच कुटुंब. साधारण पंचवीसेक लोकसंख्या. पाड्यातल्या एका मोकळ्या जागेत गावकरी, लहान मुलं आणि वाघबारस बघण्याकरिता मुंबई, पुणे येथून आलेले आम्ही सारे जमलो होतो. वाघबारसकरिता आलेल्या पाहुणे मंडळींनी पाड्यातील लहान मुलांना रंगवायचे होते. थोडक्यात काय तर त्यांनी वाघ, बिबट्या, कोळशिंदा, अस्वल कसे दिसतात या कल्पनेतून मुलांचे चेहरे रंगवायचे होते. सर्वांनी ते केले शिवाय आमच्यातले काही जण स्वतः रंगण्यासाठी इच्छुक झाले. मग तिथल्या मुलांनी आमच्या चेहऱ्यावर वाघ, कोळशिंदा असे चित्र रेखाटले. वाघबारस दिनी पाड्...